। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई व पनवेल परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणात पाळीव व रस्त्यावरच्या पशुपक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. परंतु प्राणी व पशुपक्ष्यांच्या शवदाहिनीची कुठेही व्यवस्था असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पशुपक्ष्यांसाठी शवदाहिनी उभारण्याची मागणी कफ या संस्थेतर्फे करण्यात आली आहे.पाळीव प्राण्यांच्या संख्येत पनवेल परिसरात वाढ होताना दिसून येत आहे. अनेक जण पशुपक्ष्यांवर जीवापाड प्रेम करतात. पाळीव व रस्त्यावरील पशुपक्षांच्या शेवटच्या कार्याबाबत त्यांचे मालक अतिशय संवेदनशील असतात. मनुष्याप्रमाणे या प्राणीमात्रांचे शेवटचे कार्य ही यथायोग्य पार पडण्यासाठी वीज, गॅस किंवा डिझेलच्या शवदाहिनीची व्यवस्था करावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आलेली आहे.कफ संस्था, कामोठे कॉलनी फोरम व खारघर तळोजा कॉलनी वेलफेअर असो. या सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्यांनी, पनवेल पालिका उपायुक्त विठ्ठल डाके यांची भेट घेऊन आपापली निवेदन दिली. याप्रसंगी रंजना सडोलीकर, मंगेश अढाव, ज्योती नाडकर्णी, गीता कुडाळकर व शुभांगी खरात उपस्थित होते.