। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील आठगाव कोंढवी भैरवनाथ मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासोबतच तीर्थक्षेत्र वा यात्रास्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केली. आता सर्वांच्या पाठपुराव्याने कोंढवी किल्ल्यावरील या आठगांव भैरवनाथ मंदिराच्या चिरेबंदी बांधकामामुळे आकर्षक होणार्या ऐतिहासिक क्षेत्राचा पर्यटन विकास होण्याची गरज निर्माण झाली आहे.
श्रीदेव भैरवनाथ आठगांव कोंढवीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षांपूर्वी झाला. यानंतर कोंढवीतील फणसकोंड, गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गांवांचे आराध्य ग्रामदैवत आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिरालगत नवीन भव्य हेमाडपंथी स्वरूपाचे पाषाणमंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्डयातील माती उपसण्यात आली. मातीच्या ढिगार्यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मुर्ती आढळून आल्या.