। कल्याण । वार्ताहर ।
कल्याण पूर्व विभागातील नेवाळी नाका येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.13) घडली. यामध्ये तंत्रज्ञाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ नाथा जाधव (राहणार नेवाळी पाडा, ता. अंबरनाथ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हाजीमंलग शाखा कार्यालयात कार्यरत तंत्रज्ञ एकनाथ तळपाडे हे मंगळवारी सकाळी नेवाळी नाका येथील कल्याण रोडवरील रोहित्राला फ्यूज टाकण्याचे काम करत होते. आरोपी सोमनाथ जाधव याने पंधरा दिवसापूर्वी दिलेली सर्व्हिस वायर जळाल्याची तक्रार करत तंत्रज्ञ तळपाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने लाथाबुक्क्यासह धातुच्या टणक वस्तुने तंत्रज्ञ तळपाडे यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे तंत्रज्ञ तळपाडे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तळपाडे यांच्या फिर्यादीवरून हिल लाईन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.