अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्याचे सरकार आणि शासनकर्ते कोणीही असोत ते स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात मात्र त्यांची शिक्षणाप्रती असलेली उदासीनता शिक्षकांचे प्रश्न कायम अनुत्तरित ठेवत असते असा थेट आरोप करुन त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुण्याच्या भिडे वाड्यापासून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षक मतदार संघाचे चार आमदार यांनी पायी दिंडीचे आयोजन केले आहे. ही पायी दिंडी जवळपास अर्धा टप्पा पार करून आज खोपोलीमध्ये दाखल झाली.
शिक्षक मतदार संघ कोकण विभागाचे आमदार बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे किशोर दराडे, पुणे विभागाचे दत्तात्रय सावंत आणि अमरावती विभागाचे श्रीकांत देशपांडे यांच्या समवेत आंदोलनकर्ते खोपोलीमध्ये दाखल होताच जनता विद्यालयाच्या प्रांगणात खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी आंदोलना संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की पुण्याच्या प्रसिद्ध भिडे वाड्यापासून मंत्रालयापर्यंत पायी दिंडीच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही निकाराचा लढा देण्यास सज्ज झालो आहोत. महाराष्ट्रातील जवळपास 60 ते 70 हजार शिक्षक शासनाच्या उदासीनतेमुळे वंचित आहेत. महाराष्ट्र शासनाकडे पायी दिंडीच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या प्रमुख सहा मागण्यामधे १५/११/२०११ चा शासन निर्णय लागू करुन प्रचलित धोरण सर्व विनाअनुदानित / अंशतः अनुदानित सेवकांना सुरू करणे, त्रुटींची पूर्तता करून शाळेचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करणे, शासन स्तरावरील ३९६१ शाळा, वर्ग व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या यांना तत्काळ निधी सहित घोषित करणे, विनाअनुदानित / अंशतः अनुदानित सेवकांना सेवा संरक्षणाचा शासन निर्णय निर्गमित करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, ज्युनिअर कॉलेजमधील वाढीव पदांना मंजुरी व अनुदान लागू करणे यासाठी संघर्ष सूरू असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आम्हाला वाटत आहे मात्र ठोस निर्णय घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा निर्धार आमदार किशोर दराडे आमदार दत्तात्रय सावंत आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि न्याय हक्कासाठी पुणे ते मंत्रालय अशी पायी दिंडी हा चळवळीचा नव्हे तर लोकशाहीमध्ये आपला लढा जगासमोर आणण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यात यश मिळेल असा आशावाद सर्व आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला, त्याला खोपोली शहरातील पुरोगामी शिक्षक आणि शिक्षकेत्तर संघटनेने पाठिंबा दिला आहे.
उद्या सकाळी खोपोली शहरातून मंत्रालयाच्या दिशेने पायी दिंडी प्रस्थान करेल अशी माहिती आयोजकांनी दिली.
