| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक राहिल्याने श्रीवर्धन तालुक्यात गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील 31 लहान-मोठ्या कारखान्यांमधून यंदा सुमारे 8,898 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यंदाच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भाविकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसला पूर्णपणे नाकारत शाडूच्या मातीपासून बनवलेल्या इको-फ्रेंडली मूर्तींना सर्वाधिक पसंती दिली आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या 1 ते 4 फूट उंचीच्या मूर्तींपैकी तब्बल 90 टक्के मूर्ती या शाडूमातीच्या आहेत, तर अवघ्या 10 टक्के मूर्ती पीओपीच्या आहेत. मूर्ती सुकवण्यासाठी हवामान अनुकूल असल्याने कारागिर समाधान व्यक्त करीत आहेत. सद्यपरिस्थितीत वाढत्या महागाईने त्यांच्या चिंता वाढवल्या आहेत. शाडूमाती, रंग आणि इतर कच्च्या साहित्याचे गगनाला भिडलेले दर, विजेचा लपंडाव तसेच कारागिरांची कमतरता यामुळे मूर्तींचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी मूर्तींच्या किमतीत वाढ करणे मूर्तिकारांना भाग पडले आहे. चार पिढ्यांपासून हा व्यवसाय चालवणारे श्रीवर्धन येथील मूर्तिकार उमेश आमले यांनी नव्या पिढीच्या उदासीनतेबद्दल खंत व्यक्त केली. आजची तरुण पिढी या पारंपरिक हस्तकलेकडे पाठ फिरवत आहे. जर नव्या पिढीने ही कला जपली नाही, तर शेकडो वर्षांची गणेश कारखान्यांची ही परंपरा कायमची बंद पडेल असे त्यांना सांगितले.







