फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

करंजा बंदर परिसरात सुरू असलेल्या पावसाळी मासेमारी, एलईडी लाईट मासेमारी, अवैध डिझेल पुरवठा, शासनाच्या जागांचा गैरवापर आणि कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. संबंधित मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे. दि.13 मे रोजी रायगडच्या नव्याने नियुक्त झालेल्या आयुक्त महोदयांकडे याबाबत सविस्तर तक्रार सादर करण्यात आली.

करंजा बंदरामध्ये पावसाळी मासेमारी आणि एलईडी लाईट मासेमारीसाठी लागणारी कथित बोगस कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात संबंधित अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विषयावर आयुक्त महोदयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. करंजा मच्छिमार सोसायटी परिसरात पावसाळी मासेमारीमुळे यापूर्वी जीवितहानीच्या घटना घडल्या, काही बोटी समुद्रात बुडाल्या, तर काही खलाशांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी दिखाऊ तपास करून सर्व प्रकार दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बुडालेल्या बोटीचे प्रकरण झाकण्यासाठी ती बोट मोरा बंदरावरून दुरुस्तीसाठी करंजा बंदरात आणली जात असल्याचे खोटे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये काही अधिकारी आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. एलईडी लाईट मासेमारी करून आलेल्या बोटींकडून लाखो रुपयांची कथित वसुली केली जात असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, उरण तालुक्यातील काही पेट्रोल पंपांवर 3 ते 4 हजार लिटर क्षमतेचे छोटे डिझेल टँकर ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, रायगड जिल्ह्यातील एका सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी मच्छीमारांसाठी असलेली शासनाची जागा स्वतःच्या पत्नीच्या नावावर घेतल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Exit mobile version