| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
किडनीविकाराशी झुंज देणाऱ्या डायलिसिस रुग्णांना राज्य शासनाने एसटी प्रवासात दिलेली सवलत अटींच्या जाळ्यात अडकल्याने श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना मोठा आर्थिक आणि शारीरिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालून सर्वच प्रकारच्या बसेसमध्ये कायमस्वरूपी मोफत प्रवास सवलत द्यावी, अशी करण्यात येत आहे.
शासनाने गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी एसटी प्रवासात सवलतीच्या अनेक योजना आणल्या, मात्र डायलिसिस रुग्णांसाठीची सध्याची अट जाचक ठरत आहे. श्रीवर्धनमधील रुग्णांना उपचारासाठी आठवड्यातून तीन वेळा पनवेलला जावे लागते. मात्र, महामंडळाची सवलत केवळ साध्या (लालपरी) बसेसपुरती, 100 किलोमीटर अंतरापर्यंत आणि महिन्यातून फक्त दोन फेऱ्यांसाठीच मर्यादित आहे. सध्या श्रीवर्धन आगारातून मुंबई-पनवेल मार्गावर साध्या बसेसची संख्या कमी करून त्याऐवजी ‘शिवशाही’ आणि ‘स्लीपर कोच’ गाड्या सोडल्या जात आहेत. यामुळे रुग्णांना नाईलाजाने पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागतो. शिवाय, साधी बस मिळाली तरी श्रीवर्धन ते वडखळ हे अंतरच 100 किलोमीटर होत असल्याने पुढील वडखळ ते पनवेल प्रवासाचे पैसे खिशातून मोजावे लागतात.
आठवड्यातून तीन वेळा उपचारासाठी पनवेलला आम्हाला खर्चिक आहे. साध्या बसेस कमी असल्याने शिवशाही व स्लीपर कोच बसचे पूर्ण तिकीट परवडत नाही. महिन्याला दोन फेऱ्यांची आणि 100 किलोमीटरची अट रद्द करून, उपचारासाठी सर्वच बसेसमध्ये कायमस्वरूपी 100 टक्के सवलत मिळावी.
रितेश तोडणकर,
डायलिसिस रुग्ण
