| तळा | प्रतिनिधी |
आरोग्यवर्धक बहुगुणी शेवळाची भाजी तळा बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली असून, ग्राहकांकडून शेवळा भाजीला वाढती मागणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 25 रुपयाला जुडी प्रमाणे बाजारपेठेत शेवळाची भाजी विकली जात आहे. शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात ‘ड’ जीवनसत्त्व असून, अशा भाज्या खूप कमी आहेत. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते. दाट जंगलात आपोआप उगवणाऱ्या, सर्वत्र उपलब्ध न होणाऱ्या या भाज्या म्हणजे पर्वणीच असते. एका मर्यादित कालवधीत उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या म्हणजे पोषक गुणांची खाण असतात. शेवळाच्या भाजीला जंगली सुरण असेही म्हणतात. खास मराठी लोकांच्या आहारात या शेवळाच्या भाजीला मोठे महत्त्व आहे. शेवळाच्या भाजीला इंग्रजीमधे ड्रॅगन स्टॉक याम असे म्हणतात. महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ही शेवळाची भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. त्याची शेती करता येत नाही. ही भाजी एका देठासारखी दिसते. महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बाजारात ही भाजी मिळते. गुणांनी पौष्टिक असलेली ही रानभाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते. या रानभाजीत आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्याची क्षमता असते. ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आरोग्यास उपयुक्त असल्यामुळे सध्या बाजारात शेवळाची भाजी खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.
आरोग्यवर्धक शेवळा भाजीला मागणी
