गावठाण विस्ताराचे पंचनामे करण्याची मागणी

| उरण | वार्ताहर |

गावठाण विस्तारासाठी पंचनामे न केल्यास तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचने दिला आहे. याबाबचे निवेदन त्यांनी उरणच्या तहसिलदारांना दिले आहे. बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र चव्हाण यांनी या बाबतची माहिती दिली.

बालई-काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे मूळ गावठाण दोन एकर तसेच विस्तारीत गावठाण 120 एकर असे एकूण 122 एकर आहे. एकूण एक हजार एकशे अकरा लोकसंख्या आहे. गावठाण प्रस्तावासाठी उरणचे तहसीलदार उध्दव कदम यांनी तात्काळ पंचनामे करावेत, 15 दिवसाच्या आत हा प्रश्न सोडवावा, असे निवेदनात नमुद केले आहे. गावठाण विस्ताराच्या बाबतीत उच्च न्यायालयाने प्रशासनाला सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्यासमोर तहसिलदार पनवेल आणि प्रांताधिकारी पनवेल यांनी मान्य केले की, मागील 70 वर्षात एकाही गावचा गावठाण प्रस्ताव मान्य केलेला नाही. उरण तहसिल आणि एकूणच कोकणच्या महसूल विभागाचे हे ऐतिहासिक अपयश आहे. याचा प्रचंड त्रास स्थानिक आगरी, कोळी, कराडी, ओबीसी, एससी, एसटी समाजातील नागरिकांना भोगावा लागत आहे, असे स्पष्ट केले.

95 गावांतील शेतकऱ्यांनी नवी मुंबई शहरासाठी आपल्या मालकीच्या 100 टक्के शेतजमिनी सिडकोला दिल्या आहेत. मूळ दोन एकर गावठाणाबाहेर वाढलेल्या 120 एकर जागेतील घरांवर सिडकोने अतिक्रमीत असा शेरा मारला आहे. उरणच्या तहसिलदारांनी येथे वाढलेल्या घरांच्या महसूली नोंद न केल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या पंधरा दिवसात आमच्या घरांचे पंचनामे आपल्या कार्यालयाकडून न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असेही म्हटले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, महसूलमंत्री, मंत्रालय सचिव,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय उरण, उरण पोलीस ठाणे आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version