कार्यालयात घुसून शिवीगाळ करुन धमकावले
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात घुसून पोलिस हवालदाराला नोकरी घालवून अशी धमकी देत 50 लाखांची खंडणी मागितल्याच प्रकार घडला आहे. याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग येथे असा धक्कादायक प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
याबाबतचे वृत्त असे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगडच्या पिंपळभाट येथील कार्यालयात आरोपीने काहीही काम नसताना प्रवेश करीत संबंधीत पोलिस हवालदार यांना मला तुझी नोकरी घालवायची आहे. तुझी सगळी माहिती मी काढली आहे. मला 50 लाख दे नाहीतर तुझी चौकशी करायला लावून कारवाई करायला लावतो. त्यावर हवालदारांनी मी काय म्हणून पैसे देऊ, मी एकही पैसा देणार नाही असे सांगितले. याचा राग येऊन आरोपीने हवालदाराच्या अंगावर मारण्यासाठी जात झटापट सुरु केली. त्यावेळी तिथे असलेल्या पोलिस कर्मचारी सहकार्याने हस्तक्षेप करुन सोडवासोडव केली. त्यानंतर शिवीगाळ आणि धमकी देत तो इसम रिक्षातून निघून गेला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी हवालदार घरी नसताना त्यांच्या घरी जात त्यांच्या पत्नी आणि मुलाला धमकावत तुझ्या पप्पांना 50 लाख रुपये द्यायला सांग नाहीत ऑफिसमध्ये जाऊन बदनामी करुन नोकरी घालवून वाट लावेन अशी धमकी दिली. त्यादरम्यान फिर्यादी हवालदार घरी आले असता त्यांच्यासोबत आरडाओरड करीत बिनशेती प्रकरणात तु घेतलेल्या एक कोटीपैकी 50 लाख रुपये मागितली. त्यावर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तुम्ही बिनशेतीचे ज्यांचे काम केले आहे, त्यांच्याकडूनच पैसे घ्या असे सांगितले. आणि माझ्याकडे एवढी मोठी रक्कम नाही. यापुढे तुम्ही माझ्या घरी पैसे मागायला येऊ नका नाहीत तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन असे सांगितले. त्यामुळे संबंधी पोलिस हवालदार यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस सहायक निरीक्षक एन डी लहांगे करीत आहेत.