मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

। उरण । वार्ताहर ।

ग्रामीण भागात व उरण शहरातील भागात मोकाट भटकणार्‍या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या कुत्र्यामुळे उरणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी शाळेत जाणारे मुले, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, रात्री उशिरा कामावरून घरी परतणारे कर्मचारी कामगारांवर ही मोकाट कुत्रे हल्ले करत असल्याने उरण तालुक्यातील ग्रामीण भागात व उरण शहरात प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहे. उरण नगरपरिषद हद्दीमध्ये नगर परिषद प्रशासनाने पाहिजे तसे लक्ष न दिल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उरण नगर परिषद हद्दीतील वीर सावरकर मैदान येथे काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी एका व्यक्तीला हातावर चावून जखमी केले होते. जखमी व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले होते. नगर परिषदेने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उरण नगर परिषदेने निर्बिजीकरण व भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र इटकरे यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.

उरण शहरातील भटक्या कुत्र्यांवर नगर परिषदेने योग्य ती कारवाई करावी जेणेकरून मोकाट कुत्रे नागरिकांना त्रास देणार नाहीत. एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला व त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे. जेणेकरून कुत्र्यांची संख्या वाढणार नाही. उरण नगर परिषदेने या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.

डॉ. फरहान नेरेकर
नागरिक, उरण
Exit mobile version