10 रुपये ग्लास या दराने बाजारात विकली जात आहे माती
। पनवेल । वार्ताहर ।
नवरात्री उत्सवादरम्यान घरोघरी घटस्थापना करण्यात येते. घट बसवण्यासाठी मातीची गरज लागते.ही गरज लक्षात घेऊन पनवेलच्या बाजारात सध्या मातीची विक्री केली जात आहे. 10 रुपयात ग्लास भर माती विकली जात असून मातेचे भक्तदेखील माती खरेदी करून नेण्याला पसंती देत आहेत. गुरूवारी (दि.3) पासून नवरात्रीला सुरूवात होणार आहे.या दिवसात मातेचा जागर करण्यासाठी लागणार्या पूजेच्या साहित्यानी बाजार सजले आहेत.
साहित्याची खरेदी करण्यासाठी भक्तगणांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. घटाला लागणार्या साहित्य, फळे, फुले, केळीची पाने, सुपारी, हळद कुंकू, कडधान्य त्याच बरोबर घटस्थापनेसाठी मातीचे घट आणि मातीही लागते. पूर्वी माती हवी तितकी आणि फुकट मिळत होती.मात्र शहरी भागात वाढलेल्या सिमेंट च्या जंगलात माती मिळणे अवघड झाले आहे. त्यातच आजच्या ऑनलाईन युगात घरबसल्या हवं ते खरेदी करता येत असल्याने घरात बसून खरेदीची सवय लागली असल्याने माती शोधत इकडे तिकडे फिरण्यापेक्षा बाजारात सहज उपलब्ध असलेली माती खरेदीला पसंती दिली जात आहे. यातूनच विक्रेत्यांना देखील रोजगार उपलब्ध होत असून, एक ग्राहक कमीत कमी तीन ते चार ग्लास माती विकत घेऊन जात असल्याची माहिती कळंबोली वसाहतीत माती तसेच नवरात्री उत्सवाकरता लागणार्या साहित्याची विक्री करणार्या विक्रेत्याने दिली.
मातीच्या घटाची ऑनलाईन विक्री
घट स्थापनेसाठी लागणारे मातीचे घट सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्याच सोबत अॅमेझॉन, मेशो सारख्या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्या साईडवरदेखील 200 रुपयांपासून 500 रुपयांपर्यत मातीचे सुबक आणि आकर्षक घट विक्रीसाठी उपलब्ध आहेत.