। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
रायगड किल्ल्यावर प्रतिवर्षी लाखो शिवभक्त, गडप्रेमी, पर्यटक येऊन नतमस्तक होत असतात. परंतु महाराष्ट्राची अस्मिता असलेला हा पवित्र दुर्ग काही मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. येथे कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्याचे प्रशासन, स्वयंसेवी संघटनेने ठरविले तरी त्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. भारतात अंदमानच्या सेल्युलर जेलच्या आवारांत, हैद्राबाद नजिकच्या गोवळकोंडा किल्ल्याच्या परिसरात व अन्य काही ठिकाणी अत्यंत प्रभावी अशा ध्वनी-प्रकाश शोजचे आयोजन केलेले आहे. असा शो हे पर्यटक, इतिहास प्रेमी, अभ्यासक यांच्यापर्यंत त्या-त्या स्थळाचे स्थान महात्म्य अधिकृतपणे पोहोचविण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
परंतु, ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा यशस्वी कारभार रायगडावरून केला तेथे मात्र असा ध्वनी प्रकाश शो उपलब्ध नाही. शासन, जिल्हा परिषद अथवा अन्य सक्षम यंत्रणेने गडावर योग्य जागा निवडून तेथे ध्वनि-प्रकाश शो सुरु करावा, अशी मागणी अनेक शिवभक्तांकडूने करण्यात येत आहे. तसे झाल्यास हिंदवी स्वराज्याच्या सार्या प्रभावी इतिहासाचे दर्शन लाखो पर्यटकांना, शिवभक्तांना तेथेच घेता येईल.
रायगडावर ध्वनी-प्रकाश शोची मागणी
