26 बकर्यांचा होरपळून मृत्यू
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील आगीच्या घटना वारंवार ऐकायला मिळत आहेत. या आगी जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे लागल्याचे समोर आले आहे. यामध्ये वनसंपदेच्या हानीबरोबरच पशु-पक्षीदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. मात्र, कोणताही वणवा लागलेला नसतानाही शेडसई येथील इंधरदेव ठाकूरवाडीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये शेतकर्याचा वाडा बेचिराख होऊन 26 बकर्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सकाळी कामावर जाणार्या कर्मचार्यांच्या लक्षात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने धावाधाव करण्यात आली. धाटाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या आगीत शेतकरी वामन काशिनाथ मालप यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेडसई गावातील गरीब शेतकरी वामन काशिनाथ मालप यांचा बकर्यांचा वाडा गावाच्या शेजारी आणि रोहा-मुरुड रस्त्याच्या वरच्या बाजूला आहे. याच्या आजूबाजूलाही काही गुरांचे वाडे आहेत. हे सर्व वाडे कौलारु असून, येथे जवळपास जंगल शेती असा परिसर नाही. असे असताना वामन काशिनाथ मालप यांच्या बकर्यांच्या वाड्याला इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागली की तो वाडा अक्षरशः आगीत जळून खाक झाला. ही आग शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास लागली असावी, याची कोणालाच खबर नव्हती, असे सांगण्यात येते.
सकाळी चणेराकडून रेल्वेला जाणार्या प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्यालगतच्या नागरिकांना ओरडून जागे केले असता हा प्रकार समजला, असेही समजते. ग्रामस्थांना समजताच त्यांनी तत्परतेने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने धाटाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या. तोपर्यंत वाडा आगीत भस्मसात झाला. मात्र, शेजारच्या वाड्यांचा बचाव झाला. या आगीमध्ये 26 बकर्या जळून खाक झाल्या. या घटनेने गरीब शेतकर्याचे कधी न भरुन येणारे नुकसान झाले आहे.
वामन मालप यांच्या कुटुंबातील कोणीही कमवता व्यक्त नाही. घरामध्ये वृद्ध वडील, पत्नी आणि ते अशा तीनच व्यक्ती आहेत. घराची परिस्थिती बेताची नसल्याने तो अंशतः लगतच्या हॉटेलमध्ये काम करीत असतो. वामन मालम यांचा वाडा हा कौलारु होता, त्याच्या आजूबाजूला कोणताही वणवा, शेकोटी किंवा वस्तीही नाही, त्यामुळे आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घटनास्थळी महादेवखारचे पोलीस पाटील प्रभाकर गायकर यांना ग्रामस्थांनी पाचारण केले. पुढील पंचनामा व तपासकार्य प्रशासनाच्या माध्यमातून सुरू होईल, अशी प्राथमिक माहिती त्यांनी दिली. तरी पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि कृषी अधिकारी यांनी त्वरित पीडित कुटुंबाच्या झालेल्या नुकसानीची कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.