| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ हे मुंबईचे उपनगर बनले असून, या ठिकाणी अग्निमशन यंत्रणा आवश्यक बनली आहे. ही यंत्रणेची उपलब्धता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण किंवा नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडून करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान, नेरळमध्ये जुन्या डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणेचे केंद्र उभारावे, अशी मागणी देखील जोर धरत आहे.
नेरळ हे गाव मुंबईचे उपनगर म्हणून झपाट्याने पुढे आले आहे. रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागरीकरण झपाट्याने होणारे नेरळ गाव आज उपनगरीय लोकलमुळे मुंबईच्या जवळ आले आहे. या गावात मुंबईच्या अनेक भागातून राहायला आलेल्यांची संख्या मोठी आहे. या गावात अचानक आग लागली तर कर्जत, खोपोली किंवा बदलापूर येथून अग्निशमन यंत्रणेला बोलवावे लागते. नेरळ हे माथेरानचे प्रवेशद्वारे असून माथेरानमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र, माथेरान येथून अग्निशमन यंत्रणा उपलब्ध होणे सोपे नसते. त्यामुळे नेरळ परिसराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन नेरळ मधील तरुण वर्गातून अग्निशमन केंद्र नेरळमध्ये असावे असा, सूर पुढे आला आहे. गोरख शेप आणि ग्रामपंचायत माजी सदस्यता सनी चंचे यांच्याकडून याबाबत पुढाकार घेतला जात आहे. तसेच, नेरळ गावातील कलायन-कर्जत राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला असलेल्या जुन्या डम्पिंग ग्राऊंडची जागा अग्निशमन केंद्रासाठी वापरावी, अशी मागणी पुढे आली आहे. अग्निशमन केंद्रासाठी जागेची निवड करताना काही तांत्रिक आणि भौगोलिक बाबींचा विचार करून कोणत्याही वाहतूक कोंडीतून बाहेर येण्यासाठी ती जागा मदतीला येऊ शकते आणि घटनास्थळी पोहचण्यास मदत होऊ शकते.







