Gutkha Seizure Case: गडद काळोखात साडेसात लाखांची तोडपाणी?

Oplus_131072

22 लाखांच्या गुटखा जप्तीनंतर रेवदंड्यात चर्चांचा धुरळा
नागरिकांकडून पारदर्शक चौकशीची मागणी

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

22 लाख रुपयांचा कथित गुटखा जप्त… त्यानंतर अचानक शांतता… आणि आता गावभर सुरू झालेल्या कथित आर्थिक तोडपाणीच्या चर्चांमुळे रेवदंडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारवाईनंतर साडेसात लाख रुपयांच्या कथित आर्थिक सेटलमेंटची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे रेवदंडा पोलिसांच्या संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. जर एवढी मोठी कारवाई होत असेल, तर अद्याप कोणताही गुन्हा का दाखल झालेला नाही, असा सवाल विचारला जात आहे. याबाबत खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

रेवदंडा परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या सुमारे 22 लाख रुपयांच्या कथित गुटखा जप्तीच्या कारवाईनंतर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये कारवाईनंतर आर्थिक तडजोड झाल्याच्या चर्चा सुरू असून, संबंधित व्यक्ती निर्धास्तपणे फिरत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, या सर्व चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

स्थानिक पातळीवर अशीही चर्चा आहे की, कारवाईशी संबंधित काही घटकांमध्ये पैशांच्या कथित वाटपावरून अंतर्गत मतभेद निर्माण झाले. काही व्यक्तींनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर विविध दावे केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.

दरम्यान, रेवदंडा परिसरात अवैध गुटखा विक्री, अमली पदार्थांची कथित तस्करी आणि वाढत्या व्यसनाधीनतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गांजा, एमडी आणि नशायुक्त गोळ्या सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा असून, युवक मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

काही युवकांमध्ये शरीरसौष्ठव वाढविण्यासाठी गांजाचे सेवन उपयुक्त असल्याचा गैरसमज पसरत असल्याचीही चर्चा आहे. या गैरसमजामुळे अनेक तरुण व्यसनाकडे वळत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीबरोबरच अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

तक्रार करणाऱ्यांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचते, अशी भीती नागरिकांमध्ये असल्याने अनेकजण पुढे येण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होण्याऐवजी त्यांचे मनोबल वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजीत गडदे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या चर्चांमुळे गुटखा जप्ती प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती अधिकृतपणे समोर यावी, जप्त मुद्देमालाची पुढील कार्यवाही काय झाली, संबंधितांवर कोणती कारवाई झाली आणि सुरू असलेल्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा खुलासा संबंधित यंत्रणांनी करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संशयाचे धुके कायम
22 लाखांच्या गुटखा जप्तीची कारवाई नेमकी कुठपर्यंत पोहोचली? जप्त मुद्देमालाचे पुढे काय झाले? संबंधितांवर कोणती कारवाई झाली? आणि परिसरात सुरू असलेल्या कथित तडजोडीच्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत संशयाचे धुके कायम राहणार, हे निश्चित.
पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष
रेवदंड्यातील 22 लाख रुपयांच्या कथित गुटखा जप्तीच्या कारवाईनंतर सुरू झालेल्या चर्चांमुळे आता रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारवाईनंतरच्या प्रक्रियेबाबत अधिकृत खुलासा होणार का, जप्त मुद्देमालाची पडताळणी, तपासाची सद्यःस्थिती आणि सुरू असलेल्या चर्चांमधील वस्तुस्थिती स्पष्ट केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अवैध धंदेवाल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कठोर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या आचल दलाल यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
Exit mobile version