। कोर्लई । वार्ताहर ।
मुरूड समुद्रकिनारी असलेल्या रस्त्यालगत व रस्त्यावर आलेल्या माडांवरील नारळं व सुकलेले झाप पडण्याचा संभाव्य धोका आहे. एप्रिल-मे महिना तोंडावर असताना मुरुड-जंजिरा पर्यटनात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यादृष्टीने येथील नारळ व झाप काढण्यात यावेत. त्याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी आपल्या सहकार्यांसमवेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुरुड समुद्रकिनार्यावर सध्या पर्यटकांची वर्दळ हळूहळू सुरू होत आहे. त्याचबरोबर समुद्रकिनार्यावरती फिरणार्यांची संख्या जास्त असते. समुद्रकिनार्यावर, समुद्राच्या बाजूला व रस्त्यावर अनेक माडाची झाडे झुकलेली आहेत. ही सर्व माडांची झाडे बरोबर डोक्यावर पसारा घेऊन आहेत. अनेक झाप व नारळ रस्त्यामध्ये पडतात. सुदैवाने आजतागायत कोणतीही हानी झालेली नाही. परंतु, काही महीन्यापुर्वी राजपुरी गावामध्ये एका व्यक्तीच्या डोक्यात नारळ पडून मृत्यू झाला आहे, अशी परिस्थिती व्हायला नको म्हणून हा विषय गांभीर्याने घ्यावा. रस्त्यावर आलेल्या माड मालकांना झाडे साफ करून त्यावरील झाप व नारळ काढून घेण्यासंबंधी पत्र निर्गमित करावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे शैलेश वारेकर, देवेंद्र सतविडकर, दामोदर खैरगांवकर उपस्थित होते.