भाताचे हमी भाव केंद्र सुरु करा; शेतकर्‍यांची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुका भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र, कर्जत तालुक्यात शासनाचे भात खरेदी करणारे एकच केंद्र सुरु झाले आहे. या हमी भाव भात खरेदी केंद्राचे नेरळ येथील केंद्र सुरु करावे, अशी मागणी नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य आणि शेतकरी संदीप मसने यांनी केली आहे.

कर्जत तालुक्यात खरीप हंगामात भाताचे सर्वाधिक पीक घेतले जाते. यावर्षी सरत्या पावसामुळे भाताचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेले आहे. पावसामुळे भाताच्या पिकावर आणि उत्पन्नावर मोठे परिणाम झाले आहेत. तरीदेखील शेतकर्‍यांनी भाताचे पीक गोळा करून साठवून ठेवले आहे. कर्जत तालुक्यात भाताची सर्वाधिक शेती केली जात असल्याने भाताचे पीक प्रत्येक शेतकर्‍यांच्या घरात जमा झाले आहे. भाताच्या पिकाची साठवण करून दीड महिना लोटला असून भाताचे हमी भाव खरेदी केंद्र तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात अद्याप सुरु झालेले नाही. कर्जत येथे खरेदी विक्री संघात भाताचे हमी भाव खरेदी केंद्र सुरु झाले असून तेथे कर्जत परिसरातील शेतकर्‍यांनी भाताची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

याबवबत नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सभापती राजेंद्र विरले यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाताचे हमी भाव केंद्र नेरळ येथे सुरु होईल, असे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले आहे. तर, तालुक्यातील शेतकर्‍यांनी भाताचे ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावे अशी सूचना नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्यावतीने करण्यात आली आहे.

Exit mobile version