| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील भेंडखळ परिसरातील बीपीसीएल या गॅस कंपनीलगतच असलेल्या सिडकोच्या रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करून गॅस सिलेंडरच्या शेकडो गाड्या भर रस्त्यात उभ्या असतात. सदरची अनधिकृत पार्किंग त्वरित बंद करण्याची मागणी भेंडखळ ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
कंपनीतून गॅस सिलेंडरची वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे. गॅस सिलेंडरच्या वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने कंपनीत पार्क करता येत नसल्याने ती कंपनीच्या बाहेरच उभी केली जात आहेत. पार्क केलेल्या गाड्यांचे चालक गाडीखालीच स्टोव्ह पेटवून जेवण बनवीत असतात. उद्या एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी अनधिकृतपणे उभ्या केलेल्या गाडीला धडक दिल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडूनही प्रशासन कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
प्रशासनाने अनधिकृत पार्किंग बंद केली नाहीतर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील पार्किंग त्वरित बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.