| नवीन पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बाजूला सुरू असलेल्या इमारतीच्या कामामुळे येथील रस्ता मातीत हरवला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पनवेल शहरातील साईनगर परिसरात पनवेल तहसील कार्यालय आणि शहर पोलीस ठाणे आहे. या ठिकाणी नेहमीच येण्या-जाणार्यांची वर्दळ सुरू असते. मात्र, येथे येणार्या नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे. शहर पोलीस ठाण्याच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या, डंपर, हायवा जातात. त्यांच्यामुळे रस्त्यावर माती पसरली आहे. या मातीत हा रस्ता हरवला आहे. महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. चिखलातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडते. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.