मध्यरात्रीची घटना
अधिकारी, कर्मचारी भयभीत
। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरुड ग्रामीण रुग्णालयाची एका मद्यपी रुग्णाने तोडफोड करण्याचा प्रकार घडला असून, यामुळे रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोमवारी ( 7 फेब्रुवारी) रोजी सकाळी 10 वा मद्यपि रुग्ण मंगेश शंकर जगताप (वय 38) हा उपचारासाठी दाखल झाला होता. सदरील रुग्ण मानसिकरित्या पूर्णतः शुद्धीत नसल्याने त्याला डॉक्टरांनी अलिबाग येथे जाण्यास संदर्भ चिठ्ठी देऊन जाण्यास सांगितले. परंतु तो जाण्यास अजिबात तयार नव्हता. रुग्णालयामध्ये एकही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्याला कोणी बाहेर काढू शकले नाही. याच रुग्णाने रात्री रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला.धुंदीतच त्याने मध्यरात्री 2.30 च्या सुमारास लोखंडी रॉडच्या साहाय्याने सामान्य वॉर्ड, प्रयोग शाळा, तातडीचा विभाग व प्रसूती रूम मधील सर्व दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या, प्रयोग शाळेतील कपाट, फ्रीज, तसेच इतर साहित्य तोडफोड केली. बाहेर ठेवलेले पाण्याचे कूलर तोडले, प्रसूती रूम मधील सर्व साहित्यांची तोडफोड केली आणि लोखंडी रॉड घेऊन रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचार्यांच्या अंगावर धाव घेतली. ही तोडफोड सुमारे 1 तास करत होता. यावेळी रुग्णालयात काम करणार्या बहुतांश महिला कर्मचारी असल्याने त्याला कोणीच अडवू शकले नाही.
सुरक्षा रक्षकाच्या जागा रिक्त
ग्रामीण रुग्णालयात संबंध सुरक्षा रक्षकांच्या एकूण 2 जागा शिल्लक आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून या जागाच भरल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टर व कर्मचारी यांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी येथे एकसुद्धा जागा न भरल्यामुळे येथील सुरक्षा वार्यावर आहे. कित्तेक महिन्यापासून प्रशासनाने एकही जागा भरली नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे मागच्या 3 महिन्याच्या काळात रुग्णालयाला पाणी पुरवठा करणारी मोटार चोरीला गेली तसेच कर्मचारी वृंदाच्या दोन मोटर सायकल सुद्धा चोरीला गेल्या आहेत.
रुग्णालयात बहुतांश कर्मचारी या महिला आहेत. रात्री बेरात्री महिला रुग्णालयात काम करताना संपूर्ण असुरक्षित काम करतात. प्रशासनाला सुरक्षा रक्षकांची वेळोवेळी मागणी करून सुद्धा प्रशासन याकडे पुर्णतः दुर्लक्ष करत असल्याने कर्मचारी वृंदानी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.विजय हाडबे यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुड ग्रामीण रुग्णालयात लवकरच सुरक्षा पद भरले जाईल आणि झालेल्या घटनेचा अहवाल घेण्यात येईल. तसेच पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. – डॉ.सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक