15 रुग्ण आढळले; आरोग्य विभागाकडून औषध फवारणी
| चिरनेर | प्रतिनिधी |
डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोप्रोली-पाणदिवे गावात डेंग्यूची साथ पसरली आहे. आतापर्यत डेंग्यूचे 15 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वाढ होत चालली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून जाग आलेल्या आरोग्य विभागाने गावात औषध फवारणी करण्याची पावले उचलली आहेत.
तालुक्यातील कोप्रोली आरोग्य केंद्राच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पाणदिवे गावात डेंग्यूची साथ पसरली आहे. आतापर्यत कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यूची लागण झालेल्या 15 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. डेग्युंची साथ पसरल्यानंतर खडबडून जाग झालेल्या उरण आरोग्य अधिकारी व पथकाने संपूर्ण पाणदिवे गावाची तपासणी केली. या तपासणीत पाणदिवे गावात पाणी साठवून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यात डासांच्या अळ्या मोठ्या आढळून आल्या आहेत. टाक्यामध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यामुळेच डेंग्यूची साथ पसरली असल्याच्या निष्कर्षापर्यंत आरोग्य विभाग येऊन ठेपले असल्याची माहिती उरण पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. वंदन कुमार पाटील यांनी दिली.
दरम्यान, डेंग्यूच्या साथीनंतर रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने पाणदिवे गावात तातडीने औषध फवारणी करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच सावधगिरी बाळगण्यासाठी आठवड्यातुन काही दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही गावकऱ्यांना करण्यात आले आहे.
डेग्युच्या साथीची माहिती मिळताच कोकण भवन, रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणदिवे गावाला भेट दिली. आरोग्य पथकामार्फत पाहणी करून डेंग्यूची साथ आणखी पसरणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहितीही उरण पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. वंदन कुमार पाटील यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार
कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने याआधीच परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. आरोग्य केंद्रातील स्वच्छतेचा अभाव, अपुरी साधनसामग्री आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. याबाबत तक्रारीनंतरही अधिकाऱ्यांकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांकडून कमालीची नाराजीचे वातावरण आहे. प्राथमिक केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे किरकोळ आजारांसाठीही रुग्णांना उरण, नवीमुंबई, पनवेल येथील रुग्णालयात धाव घ्यावी लागते. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचा येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.







