उरणच्या ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यात आधुनिक रुग्णालयाची गरज

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील जनतेला सध्या सर्दी, खोकला, ताप, कावीळ, मलेरिया यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. परिणामी उरणच्या ग्रामीण भागात येणाऱ्या वशेणी गावात 3, खोपटे गावात 2, कोप्रोली गावात 3, सारडे गावात 1, पाले गावात 1 व चिरनेर गावातील 2 रुग्ण हे डेंग्यू सारख्या जीवघेण्या आजारांवर तालुक्यातील कोप्रोली येथील श्री सिद्धिविनायक या खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे, त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. परीणामी येथील रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उरण तालुक्याचे औद्योगीकरण झपाट्याने वाढत असल्याने, अशा वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषणातही तेवढ्याच प्रमाणात वाढ होत आहे. अशा वाढत्या औद्योगिकरणामुळे व प्रदूषणामुळे तालुक्यात जीवघेण्या कॅन्सरच्या तसेच हृदयविकाराच्या रुग्णात देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या तालुक्यात आधुनिक रुग्णालयाची उभारणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी वारंवार येथील जनता व सामाजिक संघटना करीत आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाच्या हवामानातील बदलामुळे उरण तालुक्यातील जनतेला सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, कावीळ आणि आता मलेरिया, डेंग्यू सारख्या इतर आजारांनी ग्रासले आहे.

हे चित्र खाजगी, शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतून पुढे येत आहे. त्यात सध्या येथील शासकीय रुग्णालयात असणाऱ्या सुविधांच्या अभावामुळे अनेक रुग्णांना उदभवणाऱ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी, पनवेल, नवी मुंबई शहरातील रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे.  त्यामुळे या तालुक्यात आधुनिक रुग्णालयाची उभारणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामीण जनतेतून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version