| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील देवपाडा गावाच्या मागे पुढे जाणारा रस्ता गेली अनेक वर्षे डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गेली वर्षभर या रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण केले जात नसल्याने रस्त्यावरील खड्डे काही कमी होत नाहीत. त्यामुळे या खड्डेमय रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, परिसरातील चार गावे आणि आदिवासी वाड्यांचा हा दैनंदिन रहदारीचा मार्ग आहे.
नेरळ-कळंब रस्त्यावरून दहिवली गाव येथून वंजारपाडा मार्गे देवपाडा असा रस्ता जातो.देवपाडा गावाच्या पुढे हा रस्ता वारे गावाकडे जातो आणि तेथून तो रस्ता पुढे मुरबाड- कर्जत रस्त्याला जोडला जातो. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा शाळेला दहिवली -देवपाडा- वारे या रस्त्याचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. रस्त्याचा वापर वंजारपाडा, शेंडेवाडी, उंबरवाडी, गिर्याचीवाडी, देवपाडा, चिंचवाडी, वाघाचीवाडी, वारे अशी गावे वाड्या यांचा समावेश असून, त्या रस्त्यामुळे आदिवासी समाज आपल्या भागातील वस्तूंची ने-आण करीत असतात. त्याचवेळी अनेक आदिवासी यांचा काही ठिकाणी उदरनिर्वाहाचे साधन देखील याच भागातील जंगली मेवा यावर असते आणि त्यामुळे त्यांना या रस्त्याने धावणारी एसटी गाडी महत्वाची होती. मात्र रस्ता खराब असल्याने देवपाडा या ठिकाणी पोहोचणारी एसटी गाडी बंद झाली आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार मिळविण्याससाठी तसेच जंगली मेवा बाजाराच्या ठिकाणी नेवून विकण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
रस्त्याबाबत शासनदेखील उदासीनता दाखवत असल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ नाराज आहेत. पोशीर, दहिवली आणि वारे या तीन ग्रामपंचायतींमधील नागरिक आणि वाहनचालक यांना खड्ड्यांतून प्रवास करावा लावत असून, त्यांचे हाल होत आहेत. तरी, कागदोपत्री मंजूर झालेले रस्त्याचे काम होणार कधी?
लक्ष्मण शिनारे, माजी उपसरपंच