नैनाला हद्दपार करण्याचा निर्धार; रविवारपासून गावबंद आंदोलन

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांना देशोधडीला लावणार्‍या सिडकोच्या नैना प्रकल्पाला हद्दपार करण्याचा निर्धार प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी केला आहे. या करिता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. येत्या रविवारी 12 फेब्रुवारीपासून पनवेल तालुक्यातून या वणव्याला सुरुवात होत आहे. गाव बंद आंदोलनाच्या माध्यमातून सिडकोला खणखणीत इशारा देण्याचा मानस नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

नवी मुंबई, पनवेल, उरण मधील 270 पेक्षा अधिक गावे विमानतळ बाधित म्हणून अधोरेखित केली गेली आहेत. येथील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसविण्याच्या प्रयत्नात सिडको फुटकी कवडी देखील इन्वेस्ट न करता शेतकर्‍यांच्या जमिनीवरील मलिदा लाटण्याचा प्रयत्न करत आहे. भूमी धारकांची हक्काची जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळण्याकरता समितीने कंबर कसली असल्याचे मा. आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. नैना प्रकल्प बाधित गावांच्यापैकी रोज एक गाव बंद करून सिडको प्रशासनाला खणखणीत इशारा देण्यात येणार आहे.
आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, सिडकोच्या गल्ला भरून वृत्तीचे बाबत ग्रामस्थांना अवगत करणे हा आमचा मूळ हेतू आहे. आंदोलनाच्या बाबत माहिती देण्याकरता आमच्या गावोगावी बैठका सुरू झाल्या आहेत. कुणाचीही आबाळ होऊ नये या उद्देशाने सकाळी नऊ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी विक्री सुरू राहील. सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचार या दरम्यान गावातील सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून हा प्रकल्प कसा शेतकर्‍यांना उध्वस्त करणारा आहे याबाबत प्रबोधन केले जाईल.

यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरात, नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीते अ‍ॅड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष वामन शेळके, सचिव राजेश केणी, शेखर शेळके, नामदेवशेठ फडके, सुभाषशेठ भोपी,अनिल ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

असे होणार गावबंद आंदोलन
12 फेब्रुवारी सुकापुर, 13 फेब्रुवारी आदई ,14 फेब्रुवारी विहिघर, 15 फेब्रुवारी विचुंबे, 16 फेब्रुवारी पळस्पे, 17 फेब्रुवारी चिपळे, 18 फेब्रुवारी महाशिवरात्रीनिमित्त आंदोलन विश्रांती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आंदोलन स्थगिती, 20 फेब्रुवारी बोनशेत-भोकरपाडा, 21 फेब्रुवारी नेरे, 22 फेब्रुवारी देवद, 23 फेब्रुवारी हरीग्राम केवाळे, 24 फेब्रुवारी खानाव, 25 फेब्रुवारी रीटघर, 26 फेब्रुवारी शिरढोण, 27 फेब्रुवारी कोन, 28 फेब्रुवारी बोर्ले, 1 मार्च चिखले, 2 मार्च कोळखे, पेठ, पारपुंड, 3 मार्च ऊसर्ली डेरवली, 4 मार्च शिवकर.

Exit mobile version