वलप येथे विकासकामांचा धडाका

आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल | प्रतिनिधी |
वलप ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचा शुभारंभ रविवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष अनंतराव पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. दत्तात्रय पाटील, नगरसेवक गोपाळ भगत, जि.प. सदस्य विलास फडके, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहन कडू, रायगड एकता श्रमिक संघटना सरचिटणीस तथा दीपक फर्टिलायझर एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस प्रकाश म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती वृषाली देशेकर, विस्तार अधिकारी विश्‍वास म्हात्रे, डिप्युटी इंजिनिअर कुलकर्णी, शाळा समिती सदस्य भाऊ भोईर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते वलप येथे जिल्हा नियोजन समितीच्या सेस फंडातून टेंभे वस्तीकडे जाणारा जोडरस्ता काँक्रिटीकरण करण्यात आले. या कामासाठी दहा लाख रुपयांचा खर्च आला आहे.तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सेस फंडातील दहा लाख रुपयांच्या खर्चातून वलप गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. येथील आदिवासी वाडी येथे साडेआठ लाख रुपयांच्या खर्चातून अंगणवाडी उभारण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडीचे भूमिपूजन करण्यात आले.
ग्रामपंचायत वलप च्या स्वनिधीतून प्राथमिक शाळेमध्ये अडीच लाख रुपयांच्या खर्चातून बोलक्या भिंतींच्या पेंटिंग चे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच एक लाख रुपयांच्या निधीतून वलप गावात अकरा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

वॉटर एटीमचे उद्घाटन
विशेष उल्लेखनिय म्हणजे पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून 15 व्या वित्त आयोग अंतर्गत उभारलेल्या आर ओ वॉटर ए टी एम चे या वेळी उदघाटन करण्यात आले. प्लांट साठी 4 तर शेड साठी 2 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये कार्यान्वित होणारा हा पहिलाच प्लांट आहे. याशिवाय वलप येथे 2 लाख 99 हजार रुपयांच्या निधीतून विहीर परिसर सुशोभिकरणाचे काम देखील पूर्णत्वास आले आहे.


वलप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वेळेस महाविकासआघाडी म्हणून आम्ही जी जी आश्‍वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठी पुढच्या निवडणुकीची वाट पाहत बसलो नाही. जी विकासकामे नागरिकांना पाच वर्षात अभिप्रेत होती ती आम्ही पाच महिन्यात करून दाखवली.
आ. बाळाराम पाटील.

Exit mobile version