। नवी दिल्ली । । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिता झाला आहे. त्यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते. आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्त्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाईगीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती. – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र