। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल हे स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘स्वदेस’च्या माध्यमातून गावकर्यांनी साधलेल्या विकासामुळे देवखोल गावाला गुरुवारी सन्मानित करण्यात आले.
गाव विकास समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन गाव विकासासोबत आदर्श गाव करण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू केले. स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने गावकर्यांनी स्वच्छ, सुंदर, स्वास्थ, साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला. यानुसार कामाला सुरुवात करून गाव सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला, युवकांनी हिरीरीने मोठा सहभाग घेतला.
स्वदेस फाऊंडेशन मार्फत घरोघरी नळ, पाणीपुरवठा योजना, प्राथमिक उपचार पेटी, घरोघरी सोलर तसेच वेगवेगळ्या उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात आल्या. संपूर्ण घरांकडे फळबाग लागवड केली आहे. सर्वच लोकांचे बँक खाते असून, घर पक्के व रंगीत आहे. आरोग्य विमा, घरगुती गॅस तसेच सोलर वापरतात. नागरिकांचे आधार कार्ड, जातीचे दाखले आणि प्रत्येक कुटुंबाची आर्थिक उत्पन्न वाढ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मोतीबिंदू मुक्त गाव असून सोळा वर्षपर्यंतची सगळीच मुले शाळेत जातात. गावाने 4 लाखाचा फंड गोळा केला आहे. येथील मुंबई मंडळामार्फत दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोळा साजरा केला जातो. तसेच शालेय साहित्याचे वाटप केले जाते. या सन्मानित कार्यक्रमासाठी प्रसाद पाटील, नाथजी कटरे, शुभांगी सोनावने व ग्रामसेवक तसेच श्रीवर्धन स्वदेस टीम उपस्थित होते.