महाड-पोलादपूर प्रतापगड एसटी बससेवेला भाविकांचा प्रतिसाद

| पोलादपूर | प्रतिनिधी |
नवरात्र उत्सवामध्ये प्रतापगडवासिनी श्रीदेवी भवानी मातेच्या दर्शनासाठी महाड, पोलादपूर तालुक्यातील असंख्य भाविकांना अनेकदा वाहन मिळत नसल्याने भाविकांना वाहनाची वाट पाहावी लागते. मात्र, मागील वर्षीपासून महाड आगारातून सोडल्या जाणार्‍या प्रतापगड बसमुळे भाविकांना दर्शनासाठी सुलभ झाले आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी प्रतापगड दर्शन बससेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या बससेवेचे पोलादपूर स्थानकात स्वागत आणि निरोप समारंभ शिवसेना पोलादपूर शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक सुरेश पवार आणि नगरसेवक प्रसाद इंगवले तसेच पोलादपूर स्थानकप्रमुख राजन सुतार यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी चालक, वाहक आणि कर्मचारी तसेच प्रवासी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक प्रसाद इंगवले यांनी उपस्थित श्रीदेवी भवानी मातेच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांना शुभेच्छा दिल्या व सुरक्षितेचे बाब लक्षात घेता या बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त भाविक व ज्येष्ठ नागरिक घेतील अशी आशा व्यक्त केली. ही बस सेवा सुरू केल्याबद्दल महाड आगारप्रमुख शिवाजी जाधव यांचे देखील आभार मानले. महाड पोलादपूर प्रतापगड पहिली बस फेरी महाड आगरातून सकाळी सात वाजता पोलादपूर येथून साडेसात वाजता, तर दुसरी फेरी महाड आगरातून दुपारी दोन वाजता पोलादपूर येथून अडीच वाजता सोडण्यात येत आहे.

Exit mobile version