। अलिबाग । वार्ताहर ।
समाजसेवक म्हणून काम करणारे खरसांबळे यांच्यावर हल्ला करणे ही बाब निंदनीय आहे. मारेकर्यांसह मुख्य सूत्रधार यांना वेळीच पोलिसांनी आवरणे आवश्यक आहे. ही दडपशाही व हुकूमशाही खपवून घेणार नाही. राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी या घटनेबाबत गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे माजी आ. पंडित पाटील म्हणाले.
हेमंत खरसांबळे यांच्यावर शिंदे गटातील काही मंडळींकडून प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर अलिबागमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पंडित पाटील यांनी गुरुवारी रुग्णालयात जाऊन खरसांबळे यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी कृषीवलशी बोलताना ते म्हणाले, हेमंत खरसांबळे एक चांगला राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहे. समाजसेवक म्हणूनदेखील त्यांचे काम मोलाचे आहे. तरीदेखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. खरसांबळे यांच्यावरील झालेला हल्ला निंदनीय आहे. त्यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे. खरसांबळे यांच्यावर यापूर्वीदेखील हल्ला झाला होता. त्यांच्यावरील हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. पोलीस अधीक्षक या घटनेकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरसांबळे यांना मारहाण करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन यातील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
रुग्णालयाच्या अस्वच्छतेबाबत पंडित पाटील आक्रमक
अलिबागमधील जिल्हा रुग्णालायातील स्वच्छतेचा ठेका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावातील ठेकेदाराला देण्यात आला आहे. तरीदेखील रुग्णालयातील स्वच्छता वार्यावर असल्याचे चित्र दिसून आले. उपचारासाठी येणार्या रुग्णांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याची भीती आहे. विद्यमान आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रुग्णातील अस्वच्छतेबाबत आक्रमक पवित्रा घेत स्वच्छता चांगली ठेवा, अशी सूचना माजी आ. पंडित पाटील यांनी रुग्ण प्रशासनाला दिली.
पुढे ते म्हणाले, माजी राज्यमंत्री, शेकापच्या नेत्या स्व. मीनाक्षी पाटील यांनी रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध केला. जिल्ह्यातून येणार्या गोरगरीबांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, या भागात स्वच्छता कायम राहावी यासाठी आमदार म्हणूनदेखील मी स्वतः प्रयत्न केले आहेत. परंतु, सध्या रुग्णालयातील स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. परिसरात गवत वाढले असून, रुग्णालयातदेखील अस्वच्छता आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. रुग्णालय परिसरात स्वच्छता ठेवण्याची मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी डॉ. अंबादास देवमाने यांच्याकडे केली.