रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| रेवदंडा | वार्ताहर |
भरसमुद्रात अवैधरित्या बेकायदेशीर डिझेल विक्री करणाऱ्या रेवसगाव सारळ येथील चौघा आरोपींना रात्रीच्या सुमारास अचानक छापा मारून पोलिसांनी अटक केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेवदंडा रेती बंदरनजीक एक इंजिन बोट समुद्रातील बोटीना बेकायदेशीररित्या डिझेल विक्री करत असल्याची खबर प्राप्त झाली होती. त्यानुसार खोपोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाणे सपोनि पी.एस.स्वामी, रेवदंडा पोलिस ठाणे सेपोनि राहुल अतिग्रे यांनी सापळा रचून अचानकपणे रेवदंडा रेती बंदर नजीक खोल समुद्र खाडीत आयएनडीएमएच 1 एम. 54 या इंजीन बोटीवर छापा मारला. यामध्ये बेकायदेशीररित्या साठा केलेले अंदाजे 2 लाख 7 हजार रूपये किमतीचे 2250 लीटर व 92 रूपये प्रतिलिटर दर असलेले डिझेलसदृश्य पेट्रोलियम पदार्थ हस्तगत केले.
यावेळी पोलिसांनी एक नोंद वही, दीड इंच व्यासाचा साधारण 100 फूट लांब प्लास्टिकचा अंदाजे 2 हजार रूपये किमतीचा पाईप असा एकूण 17 लाख 11 हजार 500 रूपयांचा ऐवज ताब्यात घेतला. या बोटीवरील तांडेल परशुराम सदाशिव कोळी (49), खलाशी मारूती दामोदर कोळी (53), यज्ञेश रामा कोळी (33) सर्व राहणार रेवसगाव तसेच विनायक तुलशिराम कोळी (38) रा. बोडणी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत डिझेल कोठून तरी चोरी करून ते डिझेल अवैधरित्या विक्रीकरिता आणून विविध कर बुडवून शासनाची फसवणूक केली म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल विकास हरिश्चंद्र पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे चार आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली असून, रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.