वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांचे प्रतिपादन
| उरण | वार्ताहर |
एक महिला सुशिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. अशा आदर्शवत महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सध्या बदलत चालला आहे. तरी अशा महिलावर्गाना शाळेच्या जीवनातच कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कॉलेज, उरण या ठिकाणी श्री. मुजावर यांनी भेट देऊन विद्यार्थी व शिक्षक यांच्यासोबत वाहतूक सुरक्षा व वाहतुकीचे नियम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना देशातील महिलांना संरक्षण देणारे कायदे, सायबर क्राइम म्हणजे काय याची ही सविस्तर माहिती करून दिली. यावेळी कॉलेजचे प्रा. पी.जी. पवार, उपप्राचार्य श्री. महाले, प्रा. अमोल ठक्कर तसेच इतर प्राध्यापक, शिक्षक व सुमारे 60 ते 70 विद्यार्थी उपस्थित होते.