। पाली /बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील मॅकमोहन हुले यांच्या ‘मॅकविला द जंगल यार्ड’च्या गिर्यारोहकांनी, ‘माहुली गड अ’ समुहातील चिरा सुळक्यावर अवघड चढाई रविवारी (दि.17) सर केली.
या मोहिमेत सुधागड तालुक्यातील पोटलज गावातील मॅकमोहन हुले, ठाणे येथील साधना चंदनशीवे व सुरज तावडे, डोंबिवली येथील सागर मैस्त्री आणि कल्याण येथील वैषाक कुमार सहभागी झाले होते. शुक्रवारी (दि. 15) हे सर्वजण माहुली गड पायथ्याशी पोहोचले. यावेळी सर्वांनी रकसॅकमध्ये असलेले साहित्य, शिधा, रोप, पाणी, तंबु व इतर सर्व रकसॅक सामान लोड करुन घेतले.
सागर मैस्त्रीयांनी गाईड-लाइन करून संपूर्ण प्रस्तरारोहण मोहीम लीड केली. सर्व सुचनेनुसार ट्रेकला सुरुवात केली. एक तासाचा अंतरावर पहाटे 4 वाजता तंबु लाऊन रात्र काढली. शनिवारी (दि.16) सकाळी 7 वाजता माहुली गड ट्रेकला सुरूवात केली. गडावर महादरवाजा येथे पाण्याचे ठिकाण असल्याने दुपारचे भोजन करुन मुबलक पाणी घेऊन चिरा सुळक्याच्या दिशेने प्रस्तरारोहक निघाले. सुळका आणि गडाचा किनार्यावर असलेल्या झाडाखाली तीन तंबु लावून दुपारची विश्रांती घेतली. माहुल गड समुहात असणारे चिरा असे 2 सुळके आहेत.
झाडालगत खिंडीतुन सुळक्यांजवळ पोहचता येते. झाडाला 80 मीटर दोर बांधून चिरा सुळक्यावरील प्रस्तर बाजू ही सरळ-ठिसूळ, प्रस्तरात्मक खिळे निकामी झाले असुन, या ठिकाणी काही कालांतराने चढाई होत असल्याने 3 वेळा प्रस्तरात्मक खिळे नव्याने वापरण्यात आले होते. आताचे असलेले प्रस्तरात्मक खिळे 10 वर्ष जुने असावेत. सायंकाळचे पाच वाजता प्रस्तरारोहक माहुलीगड व भंडारगडवरील असलेली वास्तू, मार्ग, पाण्याचे ठिकाण, धान्य कोठार, तलाव, वाडे, भंडारगडलगत असलेले सुळके समूह-बफ यांची पाहणी केली. त्यांनतर महादरवाजा येथे पाणी भरुण बेस कॅम्पकडे परतले.
दुसर्या दिवशी रविवारी (दि.17) पहाटे सर्व सुळक्याच्या दिशेने निघाले. सकाळी 9 वाजता आरोहणाला सुरवात केली. प्रथम मॅकमोहन यांना सुरक्षा दोर सागर मेस्त्री यांनी दिला. पहिले 3 प्रस्तरात्मक खिळे बदलुन पुढील चढाई कृत्रिम आरोहण केली. 50 फुट आरोहण करून त्यानंतर उजवीकडे 20 फुट वळसा घालून कंगोर्यात एक प्रस्तरात्मक खिळा आहे. येथे मोठी लेज आहे. याठिकाणी 3 ते 4 आरोहक उभे राहु शकतात. दुसरे आरोहण साधना चंदनशीवे हिने सुरक्षा दोर, झुमार आधारे पहीला टप्पा इक्विपमेंट काढत कस लावुन वळसा लेज-कंगोर्यात पाऊण तासात पोहोचली. मागोमाग सागर लेज-कंगोर्यात पोहोचला. अंतिम टप्पा 50 फुट निसरडा, ठिसुळ होता. दुपारी दोन वाजता तिघेही माथ्यावर पोहोचले. संपूर्ण टिमच्या संयमाने संगठित आरोहण पूर्ण केले. त्यांनतर सर्व बेसकॅम्पवर सायंकाळी पाच वाजता पोहचले.
अवघड चढाई या मोहिमेत माहुली गड मोठा ट्रेक आहे. सोबत साधनसामुग्री (इक्विपमेंट) तितकीच जड असते. त्यामुळे ट्रेक आणखी अवघड होतो. या मोहिमेचे योग्य नियोजन सागर मेस्त्री, साधना चंदनशीवे, वैषाक कुमार, सुरज तावडे व मॅकमोहन हुले यांनी केले.
माहुली गड ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.