| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या दिघोडे-चिर्ले मार्गाची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता संपूर्ण चिखलमय व पाण्याने भरल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या रस्त्यावरील मोऱ्यांचे काम देखील अपूर्ण असल्यामुळे पाणी जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यात चिखल व माती साचून हा मार्ग चिखलमय झाला आहे. ठेकेदारांकडून या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अटल सेतू मार्गे मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, या मार्गावर वाहतुकीचा ताण लक्षणीय वाढला आहे. अवजड वाहने या रस्त्यावरून चालत असल्यामुळे हा रस्ता दर्जेदार तयार करायला हवा. मात्र, तसे होत नाही. अशी कामे करून, शासनाचा पैसा पाण्यात जात असताना, शासकीय अधिकारी आपल्या कार्यालयामध्ये निवांत बसून ठेकेदारांचे बिल पास करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट झाले असल्याने या कामात संबंधितांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.







