शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील खडसांबळे येथील नदीवरील अवघ्या एक वर्षापूर्वी बांधण्यात आलेला बंधार्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. पाण्याची साठवण व्हावी, उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्याचे बांधकाम एका वर्षात कोसळून बंधार्याच्या खालील बांधकाम एकाच पावसाळ्यात वाहून जाऊन बंधारा पूर्णतः तुटला आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याची साठवण झाली नाही. परिणामी, पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले. तसेच शासनाचा लाखो रुपयांचा निधीदेखील वाया गेला आहे.
पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संबंधित ठेकेदारावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल कारवाई करून तो बंधारा पुन्हा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधारा कोसळून गेला असून बंधारा खालील बांधकाम वाहून जाऊन संपूर्ण बंधारा कोसळून गेला आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने खडसांबळे येथील बंधार्यात पाणी साठवण होत नाही. परिणामी बंधार्याचा तेथील ग्रामस्थांना, जनावरांना उपयोग झाला नाही. शासनाने याकडे गंभीरतेने तात्काळ लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व पुन्हा सुसज्ज असा बंधारा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तरुणाचा जीव वाचला खडसांबळे येथील निकृष्ट दर्जाच्या बंधारा कोसळून बंधार्याला मोठं मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे तेथे नदीवर पोहत असताना एक मुलगा त्या कोसळून पडलेल्या भगदाडामध्ये अडकला होता. सुदैवाने त्याचा जीव वाचला. मात्र पुन्हा अशी जीवघेणी घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर बंधारा पूर्णतः सुसज्ज बंधने गरजेचे आहे.
अशा निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल संबंधित खात्याचे अधिकारी व ठेकेदार यांची बैठक घेणार आहे. त्यांना या निकृष्ट दर्जाच्या कामाची विचारणा करून संबंधित कामाची पाहणी करून मग ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.
लता मोहिते,
गटविकास अधिकारी, पाली – सुधागड
