| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कोषाने येथील वन जमिनीवर पाणी साठवण बंधारा असून त्या बंधार्यात पाण्याचा साठा अत्यल्प राहत आहे. त्या बंधार्यात पावसाळयात डोंगरातील पाण्यासोबत दगड आणि माती वाहून येऊन थांबते आणि त्यामुळे पाणी साठून राहत नाही. त्याबाबत मनसेच्या वतीने कोषाने येथील वन जमिनीवर असलेल्या बंधार्याची दुरुस्ती तसेच बंधार्यातील दगड बाहेर करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत उमरोली हद्दीतील आषाणे गावातील वनआरक्षित जागेत वनविभागाकडून बांधण्यात होता. पावसाचे पाणी साठविण्यासाठी वन विभागाने त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिट बंधारा बांधला होता. त्या सिमेंट बंधार्यामधील गाळ काढण्यात आले नाही, त्यामुळे बंधार्यात पाण्याचा साठा होत नाही. त्याचा परिणाम त्या भागातील जनावरे यांना उन्हाळयात पिण्याचे पाणी मिळत नाही. बंधारा दगड, माती आणि गाळाने भरलेला असल्याने त्या ठिकाणी पाणी साठा व्हावा म्हणून मनसेेच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, मनोज ठाणगे, आशिष ठाणगे, संदेश काळभोर यांनी वन अधिकारी यांच्याशी चर्चा करुन बंधार्याची गाळ काढून दुरुस्ती केल्यास जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकेल अशी माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.