| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य फेडरेशनतर्फे देण्यात येणार्या 2023-24 च्या दीपस्तंभ पुरस्काराने सलग तिसर्यांदा अलिबाग तालुक्यातील चोरोंडे-मापगाव येथील सहकार क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्या श्री सेवा शक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा सन्मान करण्यात आला. रामोजी फिल्म सीटी हैदराबादचे अध्यक्ष सीताराम कवळे, संचालक सुनील थळे, राजन नार्वेकर यांनी कॉस मॉस बँकेचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया नॅशनल फेडरेशनचे उपाध्यक्ष मिलिंद काळे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, गोदावरी अर्बन क्रेडिट मल्टीस्टेट सोसायटीच्या अध्यक्षा राजेश्री पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
या पतसंस्थेत 33 कोटी 28 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. 24 कोटी 47 लाख रुपयांचे कर्ज वाटप झालेले असून, 14 कोटी 4 लाखांची गुंतवणूक केलेली आहे. भाग भांडवल 1 कोटी 95 लाख रुपयांचे आहे. सी.डी. रेश्यो 64.76 टक्के, रोखता निधी 1.63 टक्के, तरलता निधी 37.93 टक्के, सीआरएआर 22.53 टक्के आहे. ही पतसंस्था आयएसओ 9001-2015 मानांकन प्रमाणित असून, सतत सहा वर्ष बँको पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा सतत तीन वर्ष दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ या पतसंस्थेने मिळवला आहे. तत्पर विनम्र सेवा, सर्व व्यवहारांकरिता एसएमएस सेवा, ठेवींवर आकर्षक व्याजदर, अल्प व्याजदरात त्वरित कर्ज, संगणकीकृत अर्थिक व्यवहार व वातानुकुलीत सेवा ही या पतसंस्थेची वैशिष्ट्ये आहेत. पतसंस्थेच्या यशामध्ये पतसंस्थेचे संचालक, सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचारी यांनी बहुमोल योगदान असल्याची प्रतिक्रिया पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम कवळे यांनी दिली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री सेवा शक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.