दिव्यांग युवक बनले आरोग्य दूत

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचा अलिबागमध्ये स्वाधार पुनर्वसन पॅटर्न


। रायगड । प्रतिनिधी ।

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार दिव्यांग प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र वरसोली – अलिबाग येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत सहा महिने कालावधीचा शास्त्रीय अ‍ॅक्युप्रेशर व मसाज चिकित्सा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो.

दिव्यांगांच्या पुनर्वसनाची व्याख्याच बदलून टाकणारे स्वाधार केंद्र 1981 पासून अविरतपणे ग्रामीण अंध अपंगांच्या प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. अलिबाग व कोकण भागातील दिव्यांग युवकांच्या पुनर्वसनासाठी प्रतिष्ठानने विभागीय प्रशिक्षण केंद्राची स्थापना फेब्रुवारी 2023 केली. या विभागीय प्रशिक्षण केंद्रात मागील 1 वर्षांपासून अंध दिव्यांगांसाठी अ‍ॅक्युप्रेशर व मसाजचे प्रशिक्षण दिले जाते. 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे अंध दिव्यांगांचा या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसर्‍या बॅचचा निरोप समारंभ व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रशिक्षण घेतलेले हे अंध विद्यार्थी आता विविध आजाराने त्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी तयार झाले आहेत. डोळे असून उपयोग नाही तर जगण्याची दृष्टी हवी आणि ही जगण्याची दृष्टी स्वाधार केंद्र या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अंध दिव्यांगांना देत आहे. आपण घेतलेले प्रशिक्षण हे तसेच न ठेवता त्याचा उपयोग करून आयुष्यात पुढे जावे, असे प्रमुख पाहुण्यांनी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे सीएसआर मॅनेजर प्रसाद पाखरे, चीफ मॅनेजर अ‍ॅडमीन अँड एच आर नवनाथ इंगळे, डॉ. निशिकांत पाटील, साउंड हिलींग थेरपिस्ट पल्लवी जांभोरे, कृषीवलचे व्यवस्थापक रूपेश पाटील, कृषीवलच्या दर्शना पाटील, वरसोली ग्रामपंचायत सदस्या नमिता माळवी, पूजा खोत, प्रशांत सुडे, प्रेरणा सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सुमित पाटील, हरिभाऊ घोडके, राहुल गवळी, सत्यजित गुरव आदींनी परिश्रम घेतले.

योग्य कौशल्य असूनही फक्त अंध असल्याने रोजगारासाठी व नोकरीसाठी संघर्ष करावा लागत होता. अंध असल्यामुळे कोणी रोजगार देण्यासही तयार नव्हते. पण स्वाधार मार्फत अ‍ॅक्युप्रेशर व मसाजचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे मी आज स्वतःच्या पायावरती उभा आहे. व मी स्वतः घरच्यांचा आधार बनलो आहे.

अभिषेक आमले,
अंध दिव्यांग
Exit mobile version