निवारा केंद्राअभावी बेघरांची गैरसोय

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल पालिका हद्दीतील बेघरांसाठी पालिकेमार्फत निवारा केंद्राची इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू असून सिडकोकडे यासाठीच्या भूखंडाची मागणी केली आहे.

केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पालिका हद्दीतील बेघरांसाठी निवारा केंद्रासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते. केंद्र सरकारकडून मिळणार्‍या अनुदानातून निवारा केंद्रात बेघरांना राहण्याची सोय करण्यात येत असते. एका खासगी संस्थेने 2018-19 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात पनवेल पालिका हद्दीत 169 बेघर नागरिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत या संख्येत वाढ झाली असण्याची शक्यता असल्याने पालिका हद्दीतील बेघरांसाठी निवारा केंद्र उभारण्यासाठी सिडको प्रशासनाकडे भूखंड देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवारा केंद्रात जागेचा अभाव
पालिकेच्या माध्यमातूनदेखील शहरातील एसटी स्थानकापासून रेल्वे स्थानकादरम्यान निवारा केंद्र चालवले जात होते. मध्यंतरी पालिकेने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत तोडण्यात आलेल्या झोपड्यांमधील नागरिक बेघर झाल्याने बेघर झालेल्या या परिवारांची राहण्याची व्यवस्था या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. अंघोळ व जेवण बनवण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शहराच्या स्वच्छतेसाठी यामधून मदत होते.

खारघरमध्ये तात्पुरती सोय
खारघर वसाहतीत एका सामाजिक संस्थेमार्फत चालवण्यात येत असलेल्या एका निवारा केंद्रात सध्या पालिकेने 30 बेघरांची राहण्याची व्यवस्था केली आहे. संस्थेच्या या केंद्रात संस्थेने शोधलेल्या बेघरांचेदेखील वास्तव्य असून पालिका प्रशासनाच्या सर्वच विभागांकडून परिसरातील बेघरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. स्थानिक पोलिसांचीदेखील या कामात पालिकेला मदत होत आहे.

बेघरांसाठी कायमस्वरूपी निवारा केंद्र उभारण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी सिडकोने भूखंड उपलब्ध करून द्यावा याकरिता सिडकोशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

विनया म्हात्रे, अधिकारी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान

Exit mobile version