बेघरांना उपचारासाठी न्यायचे कुठे?
| पनवेल | दिपक घरत |
कुणी घर देता का घर…कुडकुडणाऱ्या जीवाला…आजारात विव्हळून पडणाऱ्या जीवाला….अशी आर्त आळवणी करण्याची वेळ पनवेल पालिका हद्दीतील हजारो निराश्रतांवर आली आहे. कुठेतरी आसरा मिळवून हे सारे जीवन कंठीत असल्याचे विदारक दृष्य ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. पनवेल पालिका हद्दीत निवाराच नसलेल्यांच्या नशिबी आहे त्या ठिकाणी रात्र काढावी लागत आहे. विविध आजारामुळे रस्त्याच्या कडेला विव्हळत पडणाऱ्या निराश्रितांना उपचारासाठी न्यायचे कुठे हा प्रश्न आजारी बेघरांच्या उपचारासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांना पडत असल्याने मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांची देखील फरफट होत आहे.
झपाट्याने विकसित होत असलेल्या पनवेल पालिका हद्दीतील लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात बेघर असणाऱ्या निराधार नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे. परिणामी पालिका हद्दीत मिळेल त्या ठिकाणी ही लोक बस्तान बसवत आहेत. मिळेल ते खाऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. पावसाळ्यात मात्र अशा लोकांची स्थिती फार भयावह होते. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे छत उपलब्ध नसल्याने बेघर असलेल्या या व्यक्ती अनेकदा गंभीर आजारी पडतात. अशावेळी गंभीर आजारी असलेल्या या व्यक्तींना मदत करण्यासाठी अनेक समाजसेवी माणसं पुढे येतात मात्र पालिका हद्दीतील खाजगी रुग्णालय बेघरांवर उपचार करण्यासाठी तयार होत नाहीत .आजारी बेघर नागरिकांना उपचारासाठी आणणाऱ्या व्यक्तींनी संबंधित रुग्णच्या उपचारासाठी जवाबदारी उचलावी यासाठी रुग्णालय प्रशासन दबाव आणत असल्याने या पुढे मदतीसाठी पुढे यावे की नाही असा सवाल या व्यक्ती उपस्थित करत आहेत.
दाहक अनुभव
कळंबोली वसाहतीत राहणारे जाकीर खान यांना रुग्णालय प्रशासनाच्या अडवंणुकीचा नुकताच अनुभव आला आहे. कळंबोली वसाहतीत एक बेघर व्यक्ती जखमी अवस्थेत पडून असल्याचे माहिती मिळाली. त्या ठिकाणी पोहचलेल्या खान यांनी संबंधित व्यक्तीला उपचारासाठी नजदिकच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालय प्रशासनाने सुरवातीला बेघर रुग्णावर उपचार करण्यास नकार दर्शवत खान हे जवाबदारी घेत असल्याचे लिहून दिल्यासच रुग्णावर उपचार करण्याचे मान्य केले.
आठवडाभरात तीन घटना
मागील आठवढा भरात कळंबोली वसाहतीत आजारी पडून मारणासन्न्न अवस्थेत पडलेल्या तीन व्यक्ती आढळून आल्या आहेत. वसाहती मधिल समाजसेवी व्यक्तींनी पुढाकार घेत दोन व्यक्तींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले आहे. तर एका व्यक्तीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी नेण्यात आले आहे.
उपचारासाठी चेंबूर
पालिका हद्दीतील बेघरांवर उपचारासाठी मुंबई पालिका हद्दीत चेंबूर येथे रुग्णालय उपलब्ध आहे. मात्र पनवेल मधून चेंबूर येथे बेघर रुग्णाला उपचारासाठी नेण्यासाठी अडचणी येत असल्याने पनवेल पालिके मार्फत पालिका हद्दीतील एखाद्या रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपाचा कक्ष उपलब्ध करून द्यावा अशी मागणी समाजसेवक जाकीर खान यांनी केली आहे.
पालिका प्रशासन उदासिन
या बाबतीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना सपंर्क साधला असता पालिका हद्दीत बेघरासाठी निवारा उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात येते. मात्र त्याच वेळी काही समाज सेवि संस्था अशा नागरिकांची मदत करत असल्याचे सांगितलं जात. या संस्था सोबत सपंर्क साधला असता हे संस्था चालक कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी उत्सुकत नसल्याचे पाहायला मिळते.शासनाच्या नियमानुसार पालिका हद्दीत राहणाऱ्या बेघरा साठी पालिकेच्या माध्यमातून बेघर होम तसेच त्यांच्या जेवणाची सोय उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. पनवेल पालिका हद्दीत 2020 साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 169 बेघर नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. पालिके मार्फत बेघराना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.