। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान हे पर्यटनस्थळ असून डोंगर माथ्यावर वसलेले आहे. त्यामुळे इथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक असून जवळपास साडेतीनशे इंच इतकी पावसाची नोंद पर्जन्यमापनमध्ये करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. चोहोबाजुंनी गर्द झाडी अन् डोंगरदर्यांनी परिपूर्ण व्यापलेला परिसर असल्याने अतिवृष्टीत तसेच झाडांच्या उन्मळल्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. यासाठी नगरपालिका प्रशासन 1 जुलै ते 15 ऑक्टोबरपर्यंत आपत्कालीन व्यवस्थापन करीता कामगारवर्गांची नेमणूक करत असते.
अनेकदा पावसाळ्यातील चार महीने वादळी वाऱ्यासह झाडांची पडझड होत असते. सततच्या पावसाने रस्त्यांवरील मातीची धूप होऊन विद्युततारा उघड्या पडतात. त्यामुळे घोड्यांना शॉक लागुन त्यांचा मृत्यु होण्याची दाट शक्यता असते आणि असे प्रकार क्वचित होत असतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात भटकंतीसाठी आलेले पर्यटक पायी प्रवास करताना दिशा न समजल्यामुळे रानावनात भरकटत असतात. अशावेळी त्यांना मदतीची नितांत आवश्यकता असते. या बाबी लक्षात घेऊन नेहमीप्रमाणे याही वेळेस माथेरान नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.