जिल्हा प्रमुखांकडून शिस्तभंगाची कारवाई
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुरुड तालुक्याच्यावतीने आमदारांचा शिवसैनिकांसोबत संवाद, आभार सभा व आढावा बैठक याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुरुडचे तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर यांनी याबाबतचे नियोजन केले होते. मात्र, यामध्ये त्यांनी जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्यासह महिला जिल्हा प्रमुख, युवा जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुखांना डावलल्याने राजा केणी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसेच, पुढील आदेश येईपर्यंत मुरुड शिवसेना तालुका प्रमुख पदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही सभा तसेच आमदारांचा संवाद मेळावा बारगळला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
ॠषीकांत डोंगरीकर यांनी आमदारांचा शिवसैनिकांसोबत संवाद, आभार सभा व आढावा बैठक याबाबतच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार, त्यांची पत्नी तसेच उपजिल्हा प्रमुुख भरत बेलोसे हे मार्गदर्शन करणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात केले होते. या पत्रिकेतून जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्यासह महिला जिल्हा प्रमुख, युवा जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुखांना डावलण्यात आले होते. ही बाब केणी यांच्या लक्षात येताच त्यांनी डोंगरीकरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, ही बाब आमदारांना माहित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भोईरांसोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यासाठी त्यांनी राजा केणींचा बळी दिल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे.
शिंदे गटातील आमदार दळवी यांचा खास माणूस म्हणून राजा केणी यांना ओळखले जाते. ठाकरे व शिंदे गट अशी शिवसेनेत विभागणी झाल्यावर शिंदे गटातील जिल्हा प्रमुख म्हणून राजा केणी यांची निवड करण्यात आली. राजकीय पक्षातील वेगवेगळ्या कार्यक्रम पत्रिकेसह जाहीरातीमध्ये राजा केणी यांचे नाव आवूर्जन घेतले जाते. परंतु, मुरूड येथे होणाऱ्या शिंदे गटातील संवाद सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये राजा केणी यांचे नावच घेतले नसल्याचे दिसून समोर आले. त्यामुळे राजा केणी यांना पक्षातून काढण्याची हालचाल तर नाही ना, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
राजा केणी संतापले?
शिवसेना शिंदे गटाची जिल्ह्यातील महत्वाची बैठक होणार आहे. आमदार मतदारांचे आभार मानणार आहेत; मात्र, ज्यांच्यामुळे ते आमदार झाले, अशा कट्टर शिवसैनिकाला त्यांनी बाजुला सारल्याने केणी प्रचंड संतापले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजा केणी काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.