| उरण | वार्ताहर |
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी करंजा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु कार्यकर्त्यांची उपस्थिती नसल्याने त्यांच्यात उमेदवार बारणे यांच्यावर नाराजी असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे चाणजे ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्यांनी आ. महेश बालदी उपस्थित असतानाही बैठकीकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा नाक्यांनाक्यावर सुरू आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय महायुतीचे मावळ मतदार संघातील उमेदवारी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना जाहीर झाली होती. त्यानंतर महायुतीकडून प्रचार सुरू करण्यात आला होता. उरण विधानसभा मतदार संघात महायुतीच्या प्रमुख पदाधिकार्यांनी गाव बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी करंजा गावात अशाच बैठकीचे आयोजन आ. बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, चाणजे ग्रामपंचायतमध्ये भाजपाची सत्ता व एकूण 9 सदस्य असतानाही या बैठकीला भाजपचे अवघे दोनच सदस्य उपस्थित राहिले असल्याची धक्कादायक माहिती उपस्थित महायुतीच्या पदाधिकार्यांनी दिली. यावरून सरपंचसह इतर सदस्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे. या नाराजीचे परिणाम मावळ लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर महायुतीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे इतर पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.