। पेण । प्रतिनिधी ।
महिला सन्मान योजनेखाली एसटी महामंडळाने महिलांसाठी प्रवासात 50 टक्क्यांची दिलेल्या सवलतीचा मोठा फटका विक्रमरिक्षा व्यावसायिकांना बसला आहे.यातून कसे तरायचे याचीच चिंता आता या व्यावसायिकांना लागलेली आहे.
राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे, फडणवीस सरकारने महिलांसाठी प्रवासात सवलत दिल्याने आता महिलांचा विक्रम रिक्षाऐवजी एसटीतून प्रवास करण्याकडे कल वाढला आहे. त्याचा फटका खासगी वाहतूक सेवा देणार्या विक्रम, मिनीडोअर, इको चालकांना बसू लागला आहे. निम्या पैशात प्रवास होऊ लागल्याने महिला वर्गांनी खाजगी वाहतूक सेवेकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे रोजच्या उत्पन्नात साधारणता 40 ते 50 टक्के घट होऊ लागली आहे.
एकीकडे शासन जुनी वाहने बंद करण्यासाठी वाहन मालकांच्या मागे तगादा लावत आहेत त्यातच महिलांना 50 टक्के सवलत दिल्याने प्रवाशांच्या संख्येत मोठया प्रमाणात घट दिसून येत आहे. त्यामुळे गाडीचे हप्ते व इतर खर्च पाहता विक्रम, मिनी डोअर, इको चालकांना आपल्या कुटुंब कबिला योग्य प्रकारे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
गेली 15 ते 20 दिवस महिला प्रवाशांमध्ये मोठया प्रमाणात घट झाल्याने रोजच्या उत्पन्नात 40 ते 50 टक्के घट होत चालली आहे. अशा परिस्थितीत घर खर्च चालविणे कठीण होत आहे. शासनाने 50 टक्क्यांची सवलत दिल्याने त्याचा मोठया प्रमाणात आमच्या धंद्याला फटका बसत आहे. सवलतच द्यायची होती तर घरगुती गॅसमध्ये सवलत दिली असती तर नक्कीच त्याचा उपयोग सर्व सामान्यांना झाला असता.
-सूर्यकांत म्हात्रे,खाजगी वाहनचालक, पेण
पूर्वी सरकारी बस सेवा आणि खाजगी वाहतूक सेवा यांचे खर्च सारखेच असायचे. त्यातच बसची वाट पाहत ताटकळत राहाव लागत असतं मात्र आता 50 टक्के सवलत दिल्याने आम्ही महिला एसटी ने प्रवास करत आहोत. पैशांची बचत होत असल्याने आम्ही खाजगी वाहतूक सेवेचा विचार करत नाहीत.
सुनिता घरत, पेण