उदयनराजे भोसले यांची आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावर टीकास्र!
| किल्ले रायगड | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी, जर त्यांची हकालपट्टी झाली नाही तर याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आझाद मैदानात एकत्र येऊन सरकारला जाब विचारु, असा खरमरीत इशारा खा.उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (दि.3) किल्ले रायगडावरुन केंद्र सरकारला दिला आहे.
भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा या कार्यक्रमानंतर बोलताना राज्यपालांचा परखड शब्दांत समाचार घेतला. तसेच, भाजपाचं नाव न घेता पक्षाच्या काही नेतेमंडळींना लक्ष्य केलं. उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांना लक्ष्य करताना त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे. राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली, तर लोकांना भाजपानं उत्तर दिलं पाहिजे की का हकालपट्टी झाली नाही. त्यासाठीच आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत, असं उदयनराजे भोसलेंनी यावेळी सांगितलं.
शेकडो शिवभक्त दाखल
उदयनराजे रायगडावर शेकडो समर्थकांसह दाखल झाले होते. त्यानी प्रथम पाचाडमध्ये राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतले. त्यानंतर उदयनराजे रोप वेने रायगडावर रवाना झाले. त्यानी ‘निर्धार शिवसन्मानाचा’ असं या आंदोलनाला नाव दिले असल्याचे सांगण्यात आले. राज्यपालपदावरून कोश्यारींना हटवण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांना आपण पत्र पाठवले, परंतु अद्याप कारवाई न झाल्याने उदयनराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रायगडावर पोचल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी शिरकाई देवीचे दर्शन घेतले. होळीचा माळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला अभिवादन केले. त्याआधी उदयनराजेंनी राजमाता जिजाईंच्या समाधीचं पाचाडमध्ये दर्शन घेतले. किल्ले रायगडावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
छत्रपती उदयनराजे यांनी शुक्रवारी सायंकाळी महाडमध्ये आगमन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी महाडमधील शिवप्रेमींनी छत्रपती उदयनराजे यांचे फटाक्याच्या आतषबाजीमध्ये भव्य स्वागत केले. त्यानंतर ते किल्ले रायगडकडे रवाना झाले.
ठाम भूमिका आवश्यक
शिवाजी महाराजांनी स्वत: सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला, त्याचं विकृतीकरण होतंय. मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, तेव्हा तुम्ही ठामपणे भूमिका का घेत नाही की हे चुकीचं आहे. राज्यपालांना हटवलंच पाहिजे. राष्ट्रपती देशाचं सर्वोच्च पद आहे, राज्याचं सर्वोच्च पद राज्यपाल आहे. त्यांनीच अपमान केला असेल, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.
त्यांचा कडेलोट झाला असता
आम्ही जे काय करायचं ते करतो. काळी फीत लावून वगैरे काही होत नाही. त्यांची उचलबांगडी व्हायलाच हवी. ते इथे जर असते, तर त्यांचा टकमक टोकावरून कडेलोट झाला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले. त्यावर तुम्ही कडेलोट केला असता का? असा प्रश्न विचारताच उदयनराजे म्हणाले, त्यांचा तोल गेला असता. मी कशाला त्यांना हात लावतोय. मी त्यांना हात लावला, तर मला कमीपणा येईल. अशी टीकाही त्यांनी केली.
प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला. पुढार्यांनी जाती धर्मात तेढ निर्माण केली. देशाचे तीन तुकडे झाले आहेत. तीस तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. राजकारणातील स्वार्थ पाहून खेद वाटतो. शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे शिवरायांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. शिवरायांनी कधीच स्वार्थाचा विचार केला नाही.
छत्रपती उदयनराजे भोसले