| महाड | वार्ताहर |
तालुक्यातील दासगाव ग्रामपंचातीच्या सरपंच तपस्या जंगम यांच्यावर कामातील हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कोकण विभागीय आयुक्तांनी बडतर्फ करण्याचा निर्णय दिला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य विराज वसंत दळवी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर हा निर्णय देण्यात आला असून, तशा प्रकारचा आदेश बजावण्यात आला आहे. या निर्णयामुळे तपस्या जंगम यांना पायउतार व्हावे लागणार आहे.
महाड तालुक्यातील प्रसिद्ध अशा दासगाव ग्रामपंचायत सरपंच तपस्या जंगम यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य विराज दळवी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून काढून टाकण्याचा आदेश बजावला आहे. ग्रामपंचायत सदस्य विराज दळवी यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज करताना कर्तव्यामध्ये कसूर करत ग्रामपंचायत नियमांचा भंग केल्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती. याप्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालावरून निर्णय देण्यात आला आहे. विराज दळवी यांच्या तक्रारीनुसार प्राथमिक शाळा गृहाच्या दुरुस्तीचे बिल पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झालेले दिसून येते; परंतु सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी सदर रक्कम संबंधित ठेकेदार यांना आदा न करता इतर बाबींवर खर्च केलेली दिसली तसेच सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायती खात्यात पुरेशी रक्कम आहे किंवा नाही हे न तपासता NEFT/ RTGS द्वारे रक्कम वर्ग न करता दिलेल्या घनादेशाची नोंद रोकड वहीमध्ये केलेली दिसून येत नाही; परंतु बँकेत शिल्लक कमी असल्याकारणाने धनादेश परत आल्याने ग्रामपंचायतीने रोकड वहीवरून 31/3/2023 रोजी ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तयार करून ठेवला. सदर प्रक्रिया करताना वित्त विभागाकडून शासन निर्णयाचा भंग केलेला दिसून आला आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे.
विभागीय आयुक्तांनी दासगाव सरपंचांबाबत दिलेला आदेश आज प्राप्त झाला असून, सदर आदेश ग्रामपंचायतीकडे ग्राम पंचायत अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. अपील दाखल करण्याची सरपंच यांना मुदत आहे, अशी माहिती महाडच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली.