| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
काही वर्षांपूर्वी श्रीवर्धनचे तहसील कार्यालय येथील बाजारपेठेतील अत्यंत अपुऱ्या जागेत होते. ही ब्रिटिशकालीन इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने तसेच सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये मध्यवर्तीय प्रशासकीय भवनाची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय व कृषी विभागाचे कार्यालय कार्यरत आहेत. तसेच या इमारतीच्या बाजुला भूमिअभिलेख कार्यालय सुद्धा आहे. या इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर अनेक शासकीय कार्यालय या इमारतीत आली. या मध्यवर्ती प्रशासकीय भवनाच्या इमारतीसमोर पार्किंगसाठी खूप मोठी अशी जागा उपलब्ध आहे. परंतु, त्या ठिकाणी नागरिकांसाठी एक शेड तयार करून पार्किंगची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या ठिकाणी येणारे नागरीक आपली वाहने बेशिस्तपणे जागा भेटेल तशी लावतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना ती वाहने हटवून आपले वाहन पार्किंगमध्ये उभे करावे लागते. कधी कधी बाहेरच वाहन उभे करून चालत कार्यालयात जावे लागत आहे.
प्रशासकीय भवनासमोर बेशिस्त पार्किंग
