। अलिबाग । प्रतिनिधी ।
अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाकडून शिष्यवृत्तीच्या स्वरुपात अनुुदान दिले जाते. मात्र, ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लागणारे दाखले तहसील कार्यालयातून वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची घोर निराशा होऊ लागली आहे.
मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीमधून सामाजिक विकास साधण्यासाठी तसेच, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. केंद्राकडून 60 टक्के व राज्याकडून 40 टक्के असा निधी वितरीत केला जातो. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचा प्रश्न होत असताना आता शिष्यवृत्तीसाठी नव्याने कागदपत्रे गोळा करणार्या विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. शिष्यवृत्तीसाठी दाखले मिळविण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कार्यालयात कर्मचारीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे दाखल्यांसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची वणवण होत असल्याचे दिसून येत आहे. शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा व वय अधिवास दाखल्याची गरज निर्माण झाली आहे. अलिबागमधील तहसील कार्यालयात दाखल्यासाठी अर्ज करण्यात आले आहे. मात्र, दाखले मंजूर करणारे काही कर्मचारी गेल्या दहा दिवसांपासून कार्यालयात नसल्याने हे दाखले प्रलंबित असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. याबाबत अलिबागचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला, परंतु तो होऊ शकला नाही.
महिलांची दाखल्यांसाठी धावाधाव
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रीया सुरु झाली आहे. त्यासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी महिलांची धावाधाव सुरु झाली आहे. उत्पन्नाच्या दाखल्यापासून वय अधिवास अशा अनेक प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात महिलांची गर्दी होऊ लागली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी आहे. त्यामुळे फक्त आठच दिवस शिल्लक राहिले आहेत.