। अलिबाग । प्रतिनिधी ।
आधार प्रमाणीकरण करून ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे. यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानात केवायसी करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी गर्दी केली आहे. ऑनलाईन होणार्या या प्रक्रियेत इंटरनेटचा सावळा गोंधळ निर्माण होत असल्याने नागरिकांना तासनतास उभे राहण्याची वेळही येत आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात दहा लाखहून अधिक नागरिकांची केवायसी केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
धान्य वाटपात पारदर्शकता निर्माण व्हावी, म्हणून शासनाने ऑनलाईन धान्य वितरण करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात एक हजार 448 रास्तभाव दुकाने आहेत. या दुकानांमार्फत शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत केले. ई-पॉझ मशीनवर असलेल्या यादीनुसार धान्याचे वितरण केले जाते.
शिधापत्रिकेत असलेल्या लाभार्थ्यांची माहिती शासनाकडे राहवी, यासाठी पुरवठा विभागाने धान्य वाटप पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. शिधापत्रिकेत असलेल्या सर्व सदस्यांची आधार प्रमाणिकरण करून ई-केवायसी करण्याची हालचाल अनेक दिवसांपासून सुरू झाली आहे. त्याची अंमलबजावणीदेखील जिह्यातील दुकानांमध्ये सुरु आहे. ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अनेक गावांतील रास्तभाव दुकानांमध्ये इंटरनेटचा सावळा गोंधळ निर्माण झाल्याने ई-केवायसी करताना तासनतास दुकानासमोर उभे राहण्याची वेळ शिधापत्रिका धारकांवर आली. काही वयोवृध्दांच्या अंगठ्याचा ठसा मशीनवर दिसत नसल्याने त्यांचीही केवायसी झाली नसल्याचे दिसून आले आहे.
केवायसी करण्यासाठी 15 फेब्रुवारी अंतिम तारीख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांमधील सदस्यांची गर्दी सकाळपासूनच दिसून आली. अनेक दुकानांसमोर रांगच रांग झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. जिल्ह्यातील 17 लाख 68 हजार सदस्यांपैकी दहा लाख पाच हजार सदस्यांचे केवायसी झाले आहे. तर उर्वरित सात लाख 55 हजार सदस्यांचे केवायसी शिल्लक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. केवाय करण्याची तारिख वाढविल्यास पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पुर्ण होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.