प्रदूषणमुक्त भारताचा केला संकल्प; सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मोहिमेवर
। बोर्ली पंचतन । वार्ताहर ।
‘प्रदूषणमुक्त भारत’ चा संदेश सर्व भारतीयांना देण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी मोहीम सुरु करणार्या मुंबईतील पाच सायकलस्वारांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन 16 जानेवारी 2025 रोजी श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकातून आपल्या सायकल यात्रेला प्रारंभ केला.
या मोहिमेचे प्रमुख सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगल भानुशाली, जितेंद्र जैन, जयंती गाला आणि मनोज चौगुले या ज्येष्ठ सायकलस्वारांचं जम्मू झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी स्वागत करुन मोहिमेला झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. काश्मिर, दिल्ली, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातून चार हजार अठ्ठेचाळीस किलोमीटरची एका वेगळ्या मार्गाची ही मोहीम कोणतेही वाहन न घेता सर्व सामानासहित चाळीस दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या सायकलस्वारांनी ठेवलं आहे.
प्रत्येक गावात, जिल्ह्यात, शहरात सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा हा प्रदूषणमुक्तीचा संदेश देत जागरुकता निर्माण करत निघालेली ही सायकल यात्रा चारशे किलोमीटरचा टप्पा पार करुन पंजाबमधील फिरोजपूरला पोहोचल्यानंतर काउंटर इंटेलिजेंसचे सहाय्यक महानिरीक्षक लखबीर सिंग, विवेकानंद वर्ल्ड स्कूलचे अध्यक्ष डॉ. गौरव भास्कर आणि प्राचार्य तजिंदर पाल कौर यांच्यासह कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या सायकलस्वारांच्या पथकाचे स्वागत केले. इथल्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थितीत असलेले प्राध्यापक व दोन हजार विद्यार्थ्यांजवळ संवाद साधताना सायकल चालवणं हे चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदतच होणार आहे.आपण वाहतुकीच्या पद्धती, ऊर्जा वापरामध्ये बदल करून कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या आवाहनाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून सायकलच्या वापराबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
देशाच्या रक्षणासाठी सैनिक प्राण पणाला लावतात. पोलीस आपलं रक्षण करतात. मग आम्ही वरिष्ठ युवा देशासाठी काय करु शकतो? या संकल्पनेतून प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देण्यासाठी आम्ही काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत एका वेगळ्या मार्गानं सायकल मोहिमेचं आयोजन केलं. सायकल चालवल्याने आपण तंदुरुस्त राहण्याबरोबरच प्रदूषणमुक्त देश या मोहिमेला हातभार लावू शकतो. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा.
सतीश जाधव, संघ प्रमुख
सायकल मोहीम